भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम
श्री कानबाई माता व सप्तश्रृंगी मातेच्या भक्तीगीतांचा भव्य संगीत कार्यक्रम
भारतीय संस्कृतीत भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्ती ही केवळ श्रद्धेपुरती मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारी शक्ती आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून श्री कानबाई माता व सप्तश्रृंगी मातेच्या भक्तीगीतांचा भव्य संगीत कार्यक्रम अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनामागे कानबाई माता भक्त परिवार यांची श्रद्धा व निष्ठा असून, या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सौ. सारिकाताई कस्पटे यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या नेहमीच महिलांचा सहभाग, समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन यासाठी कार्यरत असतात. या भक्तीमय कार्यक्रमात त्यांची केंद्रस्थानी असलेली भूमिका ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप (धुळे, शिरपूर, पुणे) आणि गोल्डन बँड शिरपूर यांचे सादरीकरण लाभणार असून, प्रसिद्ध गायक कलाकार सागर देशमुख, दिलीप बाठिंगे, दिनेश बाठिंगे आणि कुणाल महाराज आपल्या सुमधुर आवाजातून भक्तीगीतांची मेजवानी सादर करणार आहेत. त्यांच्या गायनातून देवी भक्तीचा गहिरा अनुभव उपस्थितांना मिळणार आहे.
